ब्लु फ्लॅगमुळे श्रीवर्धन मतदार संघात रोजगार वाढीस चालना मिळतेय. # कोकणातील पाच समुद्र किनाऱ्यांच्या विकासासाठी २० कोटींचा निधी
कोकणातील पाच समुद्र किनाऱ्यांच्या विकासासाठी २० कोटींचा निधी
श्रीवर्धनसह महाराष्ट्रातील पाच समुद्रकिनाऱ्यांनी ‘ब्ल्यू फ्लॅग पायलट’ हा आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. समुद्र किनाऱ्याच्या सर्वांगीण विकासासाठी मिळालेले हे यश नक्कीच प्रेरणादायी आहे. भविष्यात किनाऱ्यांवर जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील. ज्यामुळे पर्यटनाबरोबर स्थानिक रोजगाराला चालना मिळेल, अशी आशा आहे.
- आदिती तटकरे, महिला व बालकल्याणमंत्री
आमदार - श्रीवर्धन मतदार संघ
ब्लू फ्लॅग पायलटचा दर्जा मिळाल्यानंतर त्या पाच समुद्रकिनाऱ्यांवर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. त्यासाठी २० कोटींच्या प्रशासकीय खर्चाला राज्य शासनाने मान्यता दिली.
अलिबाग : ब्लू फ्लॅग पायलटचा दर्जा मिळाल्यानंतर त्या पाच समुद्रकिनाऱ्यांवर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. त्यासाठी २० कोटींच्या प्रशासकीय खर्चाला राज्य शासनाने मान्यता दिली. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील कामांसाठी १ कोटी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नागाव आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांचा समावेश आहे.
डेन्मार्क येथील फाउंडेशन फॉर एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशन संस्थेने प्रायोगिक तत्त्वावर समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षा, पर्यावरण संवर्धन, पाण्याची गुणवत्तेच्या निकषावर ब्ल्यू फ्लॅग पायलटचा दर्जा दिलेला आहे. यासाठी किनाऱ्यावरील शौचालये, पिण्याचे पाणी, पार्किंग, कपडे बदलण्याच्या खोल्या, पाळणाघरे, तात्पुरती दुकाने, कचराकुंडी, जीवरक्षक टॉवर, सौरदिवे, दिशादर्शक मंडळे, कचरा व्यवस्थापन, पथदिवे, सुरक्षा रक्षक, प्रवेश रस्ते इत्यादी मूलभूत सुविधा पुरवणे आवश्यक आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पर्यटन संचालनालयाने २०२५-२६ वर्षाच्या प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत पाच समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी २० कोटींची रक्कम मंजूर केला आहे. त्यामुळे भविष्यात रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला नवी झळाळी मिळणार असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.
गुणवत्तापूर्ण कामांवर भर
ज्य सरकारने जाहीर केलेल्या जीआरनुसार ही कामे उच्च दर्जाची असावीत. यासाठी, वास्तुशास्त्रीय तज्ज्ञ आणि विषय आधारित वास्तुविशारदांची नियुक्ती करावी, प्रत्यक्ष कामे प्रसिद्ध कंत्राटदारांद्वारे करावीत, असे निर्देश दिले आहेत. कामांची योग्य देखरेख आणि गुणवत्ता नियंत्रण केले पाहिजे. प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांसाठी निविदा प्रक्रिया त्वरित अमलात आणली पाहिजे आणि कामांसाठी प्रारंभआदेश तत्काळ जारी केले आहेत. तीन वर्षांच्या कालावधीत कामे पूर्ण करणे बंधनकारक असेल. एकदा प्रारंभ आदेश जारी झाल्यानंतर, काम प्रत्यक्षात सुरू झाल्यानंतर, कोणत्याही परिस्थितीत काम, कार्यकारी यंत्रणेत कोणतेही बदल करता येणार नाहीत.
प्रत्येकी चार कोटी मिळणार
कोकणातील पाच समुद्र किनाऱ्यांना पहिल्यांदाच ब्लू फ्लॅग पायलटचा दर्जा मिळाल्याने येथील पर्यटन वाढीबरोबरच ते समृध्द होण्यास मदत होणार आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि नागाव, रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि लाडघर तसेच पालघर जिल्ह्यातील पर्णका या पाच किनाऱ्यांचा समावेश आहे. या पाचही किनाऱ्यांच्या पायाभूत सुविधा विकासासाठी प्रत्येकी ४ कोटी रुपये राज्य सरकारने मंजूर केले आहेत. त्यातील प्रत्येकी १ कोटी ४० लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.


Comments
Post a Comment